
पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर पर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश व्ही.एम. मातेरे इंफ्रा .( इ ) प्रा.ली. यांना दिनांक २२/१२/२०२० रोजी १८ महिने कालावधीसाठी देण्यात आलेले आहेत. साडे तीन वर्ष पूर्ण होऊन देखील काम पूर्ण होत नसल्याने वाघेरे यांनी स्थापत्य प्रकल्प विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये वाघेरे म्हणाले कि, विभागामार्फत पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर पर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश देऊन तब्बल ४२ महिने पूर्ण होऊन देखील अद्यापपर्यंत फक्त ७५ % टक्के देखील काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना देखील सदर कामाचे ठेकेदार यांनी वारंवार मुदतवाढीची मागणी करताना दिसून येत आहे आणि धृतराष्ट्राच्या भूमिकेत असलेले स्थापत्य प्रकल्प विभाग ठेकेदारास मनमानी पद्धतीने मुदतवाढ देत आहेत.सदर नदीवरील समांतर पुलाचे काम व्हावे याकरिता सुरुवातीच्या काळामध्ये माझ्या वतीने सुमारे ८ वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता.नदीवरील समांतर पुलाचे काम पूर्ण करण्याकरिता स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत दोन ते तीन वेळा ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आलेली असून सुमारे २० लाख ५२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे.आयुक्तांनी स्वत: माहे जानेवारी मध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केलेली आहे त्यानंतरही ठेकेदारास तीन महिने मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीच्या तीन महिन्यात देखील काम पूर्ण झाले नाही.स्थापत्य प्रकल्प विभागाच्या वतीने ठेकेदाराला या कामासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही प्रकल्प पूर्ण झालेला नाही.त्यामुळे नागरिकांना वेळेवर सुविधा तर मिळालेलीच नाही,महापालिकेचे देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले दिसून येत आहे. संबधित ठेकेदाराने यापूर्वीही महापालिकेचे कोणतेही प्रकल्प वेळेवर पूर्ण केलेले नाही तरीही स्थापत्य प्रकल्प विभाग सदर ठेकेदाराचा समावेश काळ्या यादीमध्ये का करीत नाही? ठेकेदाराचे चुकीचे नियोजन नागरिकांनी किती दिवस व का सहन करायचे या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले तर बरे होईल…
नदीवरील समांतर पुलाचे काम वेळेवर पूर्ण झाले असते तर पिंपरी गाव ,पिंपळे सौदागर,पिंपळे गुरव,रहाटणी परिसरातील नागरिकांना वाहतूक करण्यासाठी सोयीचे झाले असते.स्थापत्य प्रकल्प विभागाने ठेकेदाराला वारंवार दिलेल्या मुदतवाढीचा ठेकेदाराने फक्त गैरफायदा घेत शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केलेले आहे. आपल्या भागातील अथवा परिसरातील प्रकल्प मार्गी लागावा यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिक प्रयत्न करीत असतात याचा विसर स्थापत्य प्रकल्प विभागाला झालेला असून फक्त ठेकेदाराची मर्जी सांभाळण्यासाठी स्थापत्य प्रकल्प विभाग महाभारतातील धृतराष्ट्राची भूमिका बजावत नदीवरील समांतर पुलाच्या कामाकडे डोळेझाक करीत असल्याची तक्रार नागरिक माझ्याकडे करीत आहे.
या सर्व प्रकरणामध्ये नागरिकांना वेठीस धरून ठेकेदाराचे तसेच सल्लागाराचे हित जोपासण्याचा महापालिकेचा भोंगळ कारभार सुरु असल्याचे समोर येत आहे. ज्या कामास व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे तसेच काम नियोजनबद्ध करणेकामी महापालिका यंत्रणा देखील आहे असे काम वेळेवर होत नाही यासारखी शोकांतिका दुसरी असू शकत नाही. विकासकामे हि नागरिकांच्या सोयीसाठी असतात याचा विसर बहुतेक स्थापत्य प्रकल्प विभागास पडलेला दिसून येत आहे.
नदीवरील समांतर पुलाचे काम त्वरित पूर्ण होणेकामी धृतराष्ट्राच्या भूमिकेतील स्थापत्य प्रकल्प विभागास सक्त सूचना कराव्यात अशी मागणी वाघेरे यांनी आयुक्तांना केली आहे.


















