
पिंपरी, दि. १० मार्च २०२६ :
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मेहेत्रे वस्ती येथील वॉटर फिल्टर प्रकल्पातील पाणी पिंपरी-चिंचवड शहरासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नगरसेवक यश दत्ता (काका) साने यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कृष्णानगर परिसरातील मेहेत्रे वस्ती येथे पाणी फिल्टर प्रकल्प असून या प्रकल्पातील सुमारे ३० एमएलडी पाणी पुणे (वाघोली) येथे पुरवले जात आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी पिंपरी-चिंचवड शहरासाठी देण्याची गरज असल्याचे साने यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी महापालिकेने या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधील पाणी पिंपरी-चिंचवड शहराकडे वळविण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महापालिकेने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतल्यास शहरातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.














