
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवड प्रभाग क्रमांक १ मधील विविध भागांत कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार समोर आली आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या वतीने नगरसेवक कु. यश दत्ता (काका) साने यांनी पाणीपुरवठा विभागाकडे लेखी निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात, नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच काही भागांत पाण्यात दूषित घटक आढळून येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांचे हाल; आरोग्याचा प्रश्न गंभीर
कमी दाबामुळे अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग आदी आजारांचा धोका वाढत असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सर्व पाइपलाइनची तपासणी करण्याची मागणी
निवेदनात संबंधित भागातील सर्व पाइपलाइनची सखोल तपासणी करून गळती, तुटलेली किंवा जुनी लाईन तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून सुरक्षित व स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याची विनंती करण्यात आली आहे.
नगरसेवक साने यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी निगडित हा विषय गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात.
















