
पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार विलास लांडे यांची कन्या विनया सुधीर मुंगसे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत चुरशीच्या लढतीत उल्लेखनीय विजय संपादन केला आहे. या विजयानंतर लांडे आणि मुंगसे कुटुंबीय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे जिल्हा परिषदेत खेड तालुक्यातील कुरुळी–आळंदी जिल्हा परिषद गटातून विनया मुंगसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार शितल यळवंडे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रवादीचा बोलबाला असताना विनया मुंगसे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ‘मशाल’ तेवत ठेवत हा विजय मिळवला आहे.
माजी आमदार विलास लांडे यांची जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय होण्याची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही. शिरुर लोकसभा मतदार संघात त्यांनी सलग तीनवेळा तयारी केली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. भोसरी विधानसभा मतदार संघात 2014 पासून त्यांनी ‘कमबॅक’ करण्याचा प्रयत्न केला. इथेही त्यांच्या पदरी निराशा आली. विधान परिषदेवर त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावेळीही नशिबाची साथ मिळाली नाही. अशा परिस्थितीत पुतण्या विराज यांचा महापालिकेतील विजय आणि मुलगी विनया यांचा जिल्हा परिषदेतील विजय माजी आमदार विलास लांडे यांच्यासाठी निश्चितच आशादायी आहे.
राजकीय संघर्ष…
माजी आमदार विलास लांडे हे पवार कुटुंबीयांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. 2014 पासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये विलास लांडे यांना सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र आता पुतण्या आणि मुलीच्या रूपाने त्यांच्या राजकीय प्रवासाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक 2017 मध्ये इंद्रायणीनगर प्रभागातून लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे निवडून आले होते. मात्र 2026 च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, पुतण्या विराज लांडे यांना भोसरीत उमेदवारी मिळाली आणि त्यांनी देखील विजय मिळवला. यामुळे भोसरीच्या राजकारणात विलास लांडे यांनी पुतण्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात मुलगी विनया हिच्या माध्यमातून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर लांडे कुटुंबाला राजकीय ताकद देणारा मोठा आधार हरवला असला, तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा प्रभाव राहणार आहे, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.
















