
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :भाजपच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महापालिका भ्रष्टाचार, कर्ज आणि दहशतीच्या दलदलीत लोटली गेली असून, दमबाजी, दादागिरी आणि धमक्यांच्या जोरावर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची फोडाफोडी केली जात आहे, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
“कोणाच्या दबावाला घाबरायचे नाही. दादागिरी, दमबाजी आणि दहशत आता नेस्तनाबूत केलीच पाहिजे,” असे ठणकावून सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या आघाडीची अधिकृत घोषणा केली.
रविवारी तळवडे येथे झालेल्या विजय संकल्प सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे आदी प्रमुख नेते उपस्थित होते. याच सभेत महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
भाजपची दहशत, धमक्या आणि फोडाफोडीचे राजकारण
राष्ट्रवादीच्या काळात कर्ज नाही ; आता महापालिका कर्जात बुडवली
एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला भाजपच्या सत्ताकाळात कर्जबाजारी करण्यात आले.
१९९२ ते २०१७ या काळात राष्ट्रवादीची सत्ता असताना महापालिकेला कधीही कर्ज काढावे लागले नाही. माझ्यावर एक रुपयांचाही आरोप झाला नाही, असे सांगत अजित पवार यांनी भाजपच्या कारभारावर घणाघात केला. आज निविदांमध्ये रिंग केली जाते. ठराविक लोकांनाच निविदा भरायला सांगितले जाते. जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. महापालिकेला कर्जात ढकलणाऱ्यांना आता बाजूला करण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
पाणी, वाहतूक, मेट्रो – राष्ट्रवादीचा विकासाचा अजेंडा
शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले, “२०२९ पर्यंत शहरात पाच विधानसभा मतदारसंघ होतील. वाढत्या लोकसंख्येसाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाशिवाय पर्याय नाही. भामा आसखेडचे पाणी पुरणार नाही; मुळशी धरणातील पाणी आणले जाणार आहे. हिंजवडी-चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवली जाईल. चाकणपर्यंत मेट्रो नेली जाईल.
घड्याळ-तुतारी एकत्र, भाजपची झोप उडणार
“पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहेत. परिवार पुन्हा एकत्र येत आहे. घड्याळ आणि तुतारी एकत्र येणार आहेत. जागांचे नियोजन पूर्ण झाले असून दोन दिवसांत सर्व स्पष्ट होईल,” असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विकासदृष्टीचे कौतुक करत अजित पवार म्हणाले, हिंजवडीतील आयटी पार्क हे शरद पवारांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे.
महापालिका राष्ट्रवादीच्याच ताब्यात आणणार
“भाजपवाले माझी यादी कधी जाहीर होते याची वाट पाहत आहेत. मीही त्यांची यादी कधी येते हे पाहतो आहे. त्यांची यादी आली की आमची यादी येईल. कोणत्याही परिस्थितीत पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणायची आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते म्हणाले,
“गाफील राहू नका. पायाला भिंगरी लावून प्रचार करा. मात्र खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका. ही लढाई विकास, लोकशाही आणि दहशतविरोधाची आहे असे सांगून महापालिका राष्ट्रवादी ताब्यात आणण्यासाठी स्वतः अजित पवार मैदानात उतरले असल्याचे चित्र दिसून आले.


















