
प्रातिनिधि : शिवसेनेतून उठाव केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. सुरुवातीला आमदार आणि खासदार त्यानंतर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिंदे गटाची कास धरली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद वाढत असून शिंदे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
दीपेश म्हात्रे आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे हजारो कार्यकर्त्यांसह आज रविवारी शिवबंधन बांधणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. दीपेश म्हात्रे यांची डोंबिवलीत मोठी ताकद आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
आगामी विधानसभेची निवडणूक डोंबिवलीतून लढवण्यासाठी दीपेश म्हात्रे इच्छुक आहेत. २०१४ साली देखील त्यांनी येथून निवडणूक लढवली होती. मात्र, रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. आता आगामी विधानसभेचं तिकीट मिळावं यासाठी म्हात्रे इच्छुक होते. मात्र, युतीधर्मामुळे ही जागा भाजपला सोडली जाणार आहे. यामुळेच म्हात्रे यांनी पुन्हा ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, म्हात्रे यांच्या डोंबिवलीतील घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून उद्धव ठाकरे यांच्याकडे परतण्यासाठी शिवसैनिक आतुर झाले आहेत. दुसरीकडे कट्टर शिवसैनिकाने साथ सोडल्याने डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. डोंबिवली मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला आहे.
२००९ मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन केल्यानंतर डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ झाला होता. तेव्हापासून या मतदारसंघात कायमच भाजपाचं वर्चस्व राहिलं आहे. या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून रवींद्र चव्हाण आमदार राहिले आहेत. आता दीपेश म्हात्रे डोंबिवलीतून निवडणूक लढवणार असल्याने चव्हाण यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.


















