
आठवड्यातून एक दिवस’चा निर्धार
पिंपरी दिं.१५ मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि साधेपणाचा संदेश देत लोकप्रतिनिधींना सायकल वापरण्याचे आवाहन केल्यानंतर त्याचे पडसाद आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री स्तरावरील प्रतिसादानंतर आता पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनीही गुरुवारी संपूर्ण दिवसाचे कामकाज सायकलवरून करत या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र हा केवळ ‘एक दिवसाचा दिखावा’ राहू नये, यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस सायकलवरूनच कामकाज करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महापौर रवी लांडगे सकाळपासून विविध बैठका, पाहण्या आणि महापालिकेतील कामकाजासाठी सायकलवरून फिरताना दिसले. त्यांच्या या उपक्रमामुळे महापालिका परिसरात चर्चेला उधाण आले. वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि इंधनावरील वाढती अवलंबित्व याच्या पार्श्वभूमीवर सायकल संस्कृतीला चालना देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी काटकसर आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला आहे. केवळ एका दिवसापुरते सायकल चालवून फोटोसेशन करण्यापेक्षा त्याचे सातत्य महत्त्वाचे आहे. मी महापौरपदावर असेपर्यंत आठवड्यातून एक दिवस सायकलवरूनच कामकाज करणार आहे,” असे लांडगे यांनी स्पष्ट केले
यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्वी सुरू करण्यात आलेल्या, पण नंतर अक्षरशः बारगळलेल्या ‘शेअरिंग सायकल’ योजनेवरही भाष्य केले. शहरात मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली ही योजना नियोजनाच्या अभावामुळे आणि देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने काही महिन्यांतच कोलमडली होती. अनेक ठिकाणी सायकल स्टँड ओस पडले, तर सायकलींची मोडतोड आणि चोरीच्या घटनाही समोर आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर महापौरांनी आता ही योजना नव्याने आणि अधिक सक्षम पद्धतीने राबविण्याचे संकेत दिले. “स्मार्ट सिटीतील शेअरिंग सायकल योजना नव्याने सुरू करण्यात येईल. शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर सायकल ट्रॅक उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. नागरिकांनीही यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
















