
“पिंपरी | प्रतिनिधी :
पिंपळे गुरवमध्ये दिवाळीच्या उत्साहात रसिकांसाठी एक आगळीवेगळी सुरांची मेजवानी सजली आहे. कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवार यांच्या वतीने १९ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत ‘सुरमयी दिवाळी पहाट पिंपळे गुरव’ या चार दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे पहाटेच्या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात संगीत, कविता आणि गायन यांची अविस्मरणीय सांगड रसिकांना अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सुरेल पहाटेने
१९ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता या सुरेल दिवाळी पहाटेचा शुभारंभ दीपप्रज्ज्वलनाने होईल. या प्रसंगी सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नांदेकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवसाच्या ‘सूरपालवी’ कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका पल्लवी पत्की-ढोले, ‘झी मराठी अवघा रंग एक झाला’ फेम संदीप चाबुकस्वार, गायक आकाश सोळंकी आणि गायिका जयश्री करंबेळकर-ठाणेकर आपले स्वर सादर करतील. निवेदन योगेश सुपेकर करतील.
‘श्री. तिथं सौ.’ – तरुणाईला भुरळ घालणारी दुसऱ्या दिवसाची रंगत
२० ऑक्टोबर रोजी ‘श्री. तिथं सौ.’ या अनोख्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात गायिका मधुरा परांजपे, गायक स्वप्नील गोडबोले, गायिका चेतना भट आणि गायक मंदार चोळकर सहभागी होतील. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अमीर हडकर करणार आहेत. हा दिवस तरुण प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
‘संतवाणी ते लोकगीते व लावणी’ – पारंपरिक संगीताची मेजवानी
२१ ऑक्टोबर रोजी ‘संतवाणी ते लोकगीते व लावणी’ या विषयावर आधारित कार्यक्रम रंगणार आहे. स्वरसम्राट कै. प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत शिंदे, ‘मी होणार सुपरस्टार’ फेम गायिका वर्षा एखंडे आणि ‘सारेगम’ फेम पार्श्वगायिका राजेश्वरी पवार आपले गायन सादर करतील. निवेदन चित्रसेन भवार करणार असून पारंपरिक संगीताचा आनंद घेण्यासाठी रसिकांची गर्दी अपेक्षित आहे.
‘दिवाळी संगीतमय धमाका’ – महोत्सवाचा भव्य समारोप
२२ ऑक्टोबर रोजी ‘दिवाळी संगीतमय धमाका’ या विशेष कार्यक्रमाने सुरमयी महोत्सवाची सांगता होईल. या वेळी पार्श्वगायक त्यागराज खाडिलकर, ममता नेने-गोगटे, संतोष माहेश्वरी, रोहिणी पांचाळ आणि नितीन कदम हे लोकप्रिय गायक आपल्या स्वरांनी वातावरण रंगवतील.
दिवाळीचा आनंद स्वरांमध्ये
चार दिवस चालणारा सुरमयी दिवाळी पहाट पिंपळे गुरव हा संगीत महोत्सव सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. पहाटेच्या गारव्यामध्ये सादर होणाऱ्या या कार्यक्रमात पारंपरिक, भावगीत, लावणी आणि आधुनिक संगीताची सांगड पाहायला मिळेल.
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी रसिकांना या सुरमयी सोहळ्याचा आनंद लुटण्याचे आवाहन केले आहे.”


















