
प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या दिरंगाईच्या मुद्द्यावर २ एप्रिल २०२५ रोजी महापालिकेच्या शहर अभियंता मकरंद निकम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत स्थापत्य, विद्युत, उद्यान विभागाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार व आर्किटेक्ट उपस्थित होते

.स्मारकाच्या कामाचा संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाने होत असलेला कार्यभार, सुरक्षा रक्षकांचा अभाव आणि अवैध कामे या मुद्द्यांवर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
बैठकीत माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी स्मारकामधील फातिमाबेन शेख आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या म्युरलबाबत चौकशी केली. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना त्वरित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी प्रशासनाने दिलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, असे स्पष्ट केले. भाई विशाल जाधव यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत तीव्र भूमिका घेतली.
शहर अभियंता मकरंद निकम यांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच, ११ एप्रिल २०२५ रोजी जोतीराव फुले जयंतीच्या दिवशी झाकलेले पुतळे उघडण्याचे आदेश दिले व त्या ठिकाणी चार दिवस विशेष देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले.
बैठकीस उपस्थित कार्यकर्ते
मानव कांबळे, मारुती भापकर, आनंदा कुदळे , शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, संतोष अण्णा लोंढे, भाई विशाल जाधव, रोहिणी रासकर, विद्या शिंदे, शंकर लोंढे, बाळासाहेब शिंदे, युवराज दाखले, निखिल दळवी, प्रदीप पवार, कविताताई खराडे, वंदनाताई जाधव, बाळासाहेब रोकडे आदी कार्यकर्ते बैठकीत सहभागी झाले होते.


















