
माजी आमदारांकडून ‘ त्या ‘ शब्दाची पक्षश्रेष्ठींना आठवण
पिंपरी- चिंचवड । विशेष प्रतिनिधी : विधान परिषदेच्या 5 रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी मिळवण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण देखील करून दिली जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला होता. आता आमदारकीची माळ गळ्यात पडावी यासाठी विलास लांडे यांच्याकडून ‘त्या’ शब्दाची आठवण करून दिली जाईल का? किंवा लांडे यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या आमदारकीची माळ पडणार का? याबाबत उत्सुकता आहे.
चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुका नंतर राज्याच्या राजकीय पटलाचे चित्र 90 डिग्री मध्ये पालटले. त्यातच आता विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी स्थानिक पातळीवरील आजी माजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड मधून माजी आमदार विलास लांडे यांच्यासह माजी महापौर योगेश बहल विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक आहेत. माजी आमदार विलास लांडे यांनी तर मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहे.
़राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे मात्र, दुसरीकडं विधान परिषदेच्या 5 जागा रिक्त झालेल्या आहेत. त्या जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. भाजपा तीन, शिवसेना (शिंदे गट) एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एक जागा रिक्त झाली आहे. या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे


















