
पिंपरी प्रतिनिधी – सद्यस्थितीला भारत देशामध्ये लोकसभेचे बिगुल वाजत आहे. सद्यस्थितीला भारत देशामध्ये लोकसभेचे बिगुल वाजत आहे. भारतात, भारतीय लोकशाहीमध्ये तरुणांच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. कोणत्याही राष्ट्राच्या विकासात तरुणांचा राजकीय सहभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. भारताचे भविष्य घडवण्यात तरुणांची भूमिका विशेष महत्त्वाची आहे. राजकारणातील तरुणांना अनेकदा बदलाची प्रेरक शक्ती म्हणून पाहिले जाते आणि त्यांचा सक्रिय सहभाग देश कोणत्या दिशेने घेतो यावर लक्षणीय परिणाम करू शकतो. योग्य पाठिंब्याने आणि संधींसह, भारत खऱ्या अर्थाने एक उगवता युवा उदयोन्मुख भारत बनू शकतो. पिंपरी चिंचवड शहरातील उदयोन्मुख नेतृत्व संदीप वाघेरे यांना मावळ मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मा.नगरसेवक शैलेश मोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सन २०१७ साली भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये श्री.संदीप बाळकृष्ण वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. शहरामध्ये सर्वाधिक मते मिळवण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर नोंदविला गेला होता. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करीत प्रभागामध्ये विकासगंगा खेचून आणली.
शहर पातळीवर काम करीत असताना त्यांनी नदी सुधार,रेल्वे उड्डाणपूल, नदीवरील समांतर पूल,अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत रस्ते,उद्याने,सोलर सिस्टीम,आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडांगणे,पाणी प्रश्न, सुरक्षेसाठी सि.सि.टी.व्ही. वृक्षारोपण,अत्याधुनिक स्मशानभूमी असे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. कोविड १९ सारख्या महामारीच्या काळामध्ये स्वखर्चातून नवीन जिजामाता रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास जवळपास ७५ लाख रुपयाची उपकरणे भेट देण्यात आली होती तसेच प्रभागामध्ये गेली १२ वर्ष गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, खेळाडूंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, दही हंडी, रावण दहन सारखे सांस्कृतिक कार्यक्रम, एक गाव एक शिवजयंती, गणेश विसर्जन कृतीम तलाव , यासारखे अनेक उपक्रम ते राबवीत असतात.
संदीप वाघेरे यांच्यासारख्या युवा उदयोन्मुख तरुणास भारतीय जनता पक्षाच्या वतीने मावळ मतदारसंघातून लोकसभेसाठी संधी मिळाल्यास ते नक्कीच या संधीचे सोने करीत त्यांच्यामध्ये
असलेल्या प्रभावी नेतृत्वाच्या गुणांमध्ये धैर्य, सामर्थ्य, प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता,
ज्ञान, निर्णयक्षमता, सचोटी आणि परस्पर कौशल्ये यांचा समावेश होतो. विशेषत: महत्त्वाचा गुण म्हणजे दृष्टी, त्या दृष्टीची अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्तीच्या जोरावर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी ‘विकसित भारत @ 2047 : तरुणाईचा आवाज’ या उपक्रमांतर्गत भारत देशाला महासत्ता बनविण्यास मोलाची भूमिका बजावतील असा माझा व माझ्या सहकाऱ्यांचा विश्वास आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून श्री संदीप बाळकृष्ण वाघेरे यांना मावळ मतदारसंघातून लोकसेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी शैलेश मोरे यांनी केली आहे.


















