
भाजपच्या गडाला धक्के; महाविकास आघाडीची घोडदौड सुरूच
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सध्या रंगत आली आहे. मतदानाला आता अवघे ११ दिवस शिल्लक राहिलेले असतानाच भाजपचा एक-एक गड कोसळू लागला आहे. भाजपमध्ये उमेदवारीसह विकासकामे आणि महापालिकेतील भ्रष्टाचारावरून मोठा कलह आहे. ठेकेदारी, लाचखोरी, खंडणीखोरी आणि भ्रष्टाचार या बाबींमुळे भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागणार हे आता जवळपास उघड सत्य समजले जाऊ लागले आहे. त्याचाच परिणाम आता भाजपचेच माजी नगरसेवक व पदाधिकारी पक्षातून बाहेर पडण्याच्या बेतात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या छुप्या चर्चेला अंतर्गत कलहावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.
या पक्षाचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडे पाठविला आहे. ऐन पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी दिलेला राजीनामा हा भाजपचे पाय आणखी खोलात ढकलणारा ठरला आहे. तर महाविकास आघाडीची ताकद वाढविणारा मानला जात आहे. कामठे यांच्यानंतर राजीनाम्याच्या तयारीत अनेकजण असल्याचे सांगण्यात येत असून येत्या दोन चार दिवसांत ही नाराज मंडळी पक्षातून बाहेर पडल्यास भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार यावर शिक्कामोर्तब करणारे ठरणार आहे.


















