प्रतिनिधी : भोसरी-वाकड बीआरटीएस रस्त्यावर पिंपळे गुरव येथील गजोबी हॉटेल चौकात आवश्यकतेपेक्षा मोठा पदपथ केल्याने स्कुल बस, कंपनीच्या बसला वळण घेता येत नाही. परिणामी या चौकात अनेकदा वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या चौकात पदपथाची रुंदी कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ते प्रशस्त झाले, तशा अडचणीतही भर पडली आहे. वाकड-भोसरी बीआरटीएस रस्ता, तसेच या रस्त्यावरून पिंपळे गुरवमध्ये प्रवेश करतानाचा रस्ताही प्रशस्त बनविला आहे. पिंपळे गुरव, दापोडी, सांगवी, औंध, बाणेर, पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी सोयीचा रस्ता म्हणून नागरिक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. पदपथही प्रशस्त बनविल्याने नागरिकांना चालणे सोयीचे झाले आहे.
याचा फटका मोठ्या गाड्या, स्कुल बस, कंपनीच्या बसेसला बसत आहे. भोसरी – वाकड बीआरटीएस रस्त्यावरून पिंपळे गुरवकडे वळताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा या ठिकाणी वळण घेताना वाहतूक कोंडी होऊन नाशिक फाटा उड्डाणपुलावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे या चौकातील केवळ ५० मीटर एवढ्या अंतरातील पदपथाची रुंदी कमी केली, तरी वाहचालकांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
पिंपळे गुरव येथील गजोबी हॉटेल चौकात पादचाऱ्यांची वर्दळ नसते. अगदी छोटा पदपथही पुरेसा पडू शकतो. मात्र, या चौकात केवळ एका चेंबरचे कारण देत स्मार्ट सिटीने पदपथ आवश्यकतेपेक्षा रुंद बनविला आहे. या ठिकाणचा चेंबर ऍडजस्ट करून पदपथाची रुंदी कमी करून वाहनचालकांचा त्रास कमी करावा.